टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील काही दिवसांपासून भगिरथ भालके यांचे राजकारण हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याभोवतीच फिरत आहे. एका साखर कारखान्यापेक्षा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आणि कामे आहेत.
पोटनिवडणुकीच्या निकालापासून संघटनेचे व लोकांच्या प्रश्नांवर किती काम केले, असा सवाल उपस्थित करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचेही भरमेळाव्यात कान टोचले.
शेतकऱ्याच्या उसाचे व कामगारांचे थकीत पैसे मिळाले पाहिजेत, याच्याशी मी सहमत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून केवळ उसाचे आणि कामगारांच्या पैशांभोवतीच त्यांचे राजकारण फिरत आहे. त्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगत यापुढे लोकांमध्ये मिसळून काम करा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
मंगळवेढा-पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पक्ष पदाधिकाऱ्यांच्या काही चुकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पक्षसंघटन मजबूत असेल, तरच निवडणूक सोपी जाते.
निवडणूक काळात मी अनेक वेळा भगिरथ भालकेंकडे बूथ कमिट्याची माहिती मागितली होती. परंतु आज देतो, उद्या देतो, असे ते सांगत होते. शेवटपर्यंत त्यांनी बूथ कमिट्यांची माहिती दिली नाही.
बूथवर काम करणारा कार्यकर्ताच नसेल, तर यश कसे मिळणार, असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगिरथ भालके यांच्या पराभावाचे कारणच स्पष्ट केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पंढरपुरात परिवार संवाद मेळावा पार पडला. त्या वेळी त्यांनी मजबूत पक्ष संघटन कसे असावे, या विषयी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मंगळवेढ्याचे तालुकाध्यक्ष बी. पी. पाटील आणि पंढरपूरचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना बूथ कमिट्या आणि कार्यकारणीच्या निवडीविषयी विचारले असता बूथ कमिट्या नेमल्या नसल्याचे समोर आले.
त्यानंतर जयंत पाटील यांच्या रागाचा पारा चढला. त्यावेळी त्यांनी भालके यांच्याबाबतची गोष्ट सांगितली.
पाटील म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचा पराभव धुवून काढा.
मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच शरद पवार यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ केला जाणार आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज