टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात ग्राम राजस्व अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्यावर भर असणार आहे. तसेच गावातील मिळकती घर तसेच सातबाऱ्यावर पती-पत्नी या दोघांचे नाव लागणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार २६ जानेवारीपासून ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २५ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचा कारभार डिजिटल करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे सर्व दाखले ऑनलाइन प्रणालीने देण्यात येणार आहे. या अभियानात गावातील मिळकतींची नोंदणी पती व पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्याचा उपक्रम घेण्यात येणार आहे. वारस नोंदी व हरकतीबाबत व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडून विविध योजना राबविण्यात येतात. या कार्यालयात नागरिकांना अनेकदा यावे लागते. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येते. परिणामी शासन स्तरावर तक्रारी वाढतात.
महसूल खात्याने राबविलेल्या राजस्व अभियानाच्या धर्तीवरच ग्रामविकास खात्याने नागरिकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ग्राम राजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्चअखेर होईल कर वसुली
मिळकती व त्यासंबंधी प्राप्त तक्रार व अर्जावर सरपंच व सदस्यांच्या उपस्थिती प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीची मासिक सभा आयोजित करून मिळकतीच्या नोंदी कायम करण्यात येणार आहेत. शंभर टक्के कर वसुली मार्च अखेरपर्यंत वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
खासगी डॉक्टरांची मदत..
महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील शंभर टक्के बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण राबवायचे आहे. गावातील सर्व मुले कुपोषणमुक्त करायची आहेत. यासाठी खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने जिल्ह्यात सर्व ठिकाणी आरोग्य शिबिरेही आयोजित करण्यात येणार आहेत.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज