टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तपासणीअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार बालकांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे.
यातील 20 बालकांना कोरोना झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
स्वामी म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून यामध्ये बालके बाधित होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
येत्या काळातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.
ग्रामीण भागातील 9 लाख 77 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
तपासणी मोहिमेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 20 मुले कोरोना पॉझीटिव्ह सापडली असून त्यांच्यावर डॉक्टराच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत, शिवाय विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे.
स्वामी म्हणाले, जिल्हा परिषदेकडून चालू असलेल्या आरोग्य तपासणीमध्ये व्यंग किंवा इतर कोणतेही शारीरिक आजार असणार्या बालकांची वेगळी यादी केली जात आहे. या विद्यार्थ्यांवरही आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये ताप, सर्दी तसेच खोकला अशी कोरोनासदृश लक्षणे सुमारे 15 हजारांवर मुलांच्यात आढळून आली आहेत.
अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असून पालकांनी स्वच्छतेची काळजी व कोरोनाची दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तपासणीत 15 हजार बालकांना कोरोनासदृश लक्षणे आढळून आली आहेत. बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले जात आहे. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
दुर्दैवाने लागण झाल्यास त्या संदर्भात नियोजन चालू आहे. कोव्हिड सेंटर्स तसेच सर्व हॉस्पिटलमध्ये 20 टक्के बालकांसाठी बेड राखून ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बालकांना त्रास होऊ लागल्यास तेथे स्थलांतर करून उपचार सुरू करता येतील. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
साेलापूर जिल्ह्यात कोरोनाने 5 मृत्यू
आज शहरासह ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या व मृत्यूसंख्या कमी झाली आहे. गुरुवारी केवळ ग्रामीण भागात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने 297 रुग्णांची भर पडली आहे. 469 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्याप 185 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
गुरुवारी ग्रामीण भागातील 8 हजार 435 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 145 अहवाल निगेटिव्ह, तर 290 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 458 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सोलापूर शहरातील 933 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 926 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 7 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 11 जण घरी गेले.
आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 33 हजार 8 जण, तर शहरातील 28 हजार 514 जण, असे एकूण 1 लाख 61 हजार 522 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 2 हजार 957, तर शहरातील 1 हजार 404, अशा 4 हजार 361 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 990 तर शहरातील 56, अशा एकूण 2 हजार 36 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 71 जण आणि शहरातील 27 हजार 54, असे 1 लाख 55 हजार 125 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज