मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आपण समाजासाठी जर चांगले काम केेले तर ते कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहत असल्याचे प्रतिपादन हिंदी व मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
दै.स्वाभिमानी छावाच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित वर्षारंग या हिंदी, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
वर्षा उसगावकर म्हणाल्या, आज पश्चिम महाराष्ट्रात पुरग्रस्त परिस्थितीमुळे दुःखाचे सावट आहे. स्वाभिमानी छावाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला उपक्रम अतिशय योग्य आणि स्तुत्य आहे. गणेशोत्सवास सुरूवात होणार आहे. परंतु अशा परिस्थितीत गणेशोत्सव साधेपणाने व जास्त खर्च न करता उत्साहात साजरा करावा व ते पैसे सामाजिक कार्यासाठी वापरावेत.
डीजेची थिल्लरबाजी अतिशय घातक आहे. मोठा आवाज केल्याने मंडळ मोठे ठरत नाही. डीजेच्या आवाजाचा त्रास हॉस्पिटलमधील रूग्ण, शाळा कॉलेजामधील विद्यार्थी, विशेषतः आपल्या घरातील अबालवृद्धांना होतो. त्यामुळे याचे भान सर्वांनी ठेवून गणेशोत्सवाचा आनंद लुटताना इतरांना त्याचा त्रास होवू नये याची काळजी घ्यावी. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सामाजिक एकोप्यासाठी सुरू केला आहे. हेही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ समाजसेवक शिवाजीराव पवार यांचे हस्ते व माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर यांचे हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर दै.स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे, कार्यकारी संपादक महेश वठारे, राजेंद्रकुमार जाधव, सुलेमान तांबोळी आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमात वर्षा उसगावकर व महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज यांनी आज हम तुम ओ सनम, अश्विनी ये ना, चोरीचा मामला, मी आले निघाले, भुला साथी कोई दुजा, आगे भी जाने ना तू, तुम्हारी नजर क्यों खपा हो गयी अशी एका पेक्षा एक सलग सात गाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात पंढरपूरचे रफिक शेख, सोलापूरचे प्रथितयश डॉक्टर तथा जगावेगळी अंतयात्रा या चित्रपटाचे निर्माते नितीन तोष्णीवाल, अनिता अय्यर, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे यांनीही विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव व सुलेमान तांबोळी यांनी केले. शेवटी महेश वठारे यांनी आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज