टीम मंगळवेढा टाईम्स ।
गाळप हंगाम संपल्यानंतर साखर कारखान्यांकडून उसबिले थकवून ठेवली जातात. यंदाही हेच चित्र असून राज्यातील कारखान्यांनी तब्बल १ हजार ४५८ कोटी रुपयांचे बिले थकवली आहेत.
राज्यातील १६० पैकी २४ कारखान्यांकडेच ६५७ कोटींची थकबाकी असल्याने आज साखर आयुक्तांनी या कारखान्यांना साखर जप्ती नोटीस पाठवली आहे. या कारखान्यांमध्ये भगीरथ भालके,माजी मंत्री सुभाष देशमुख,पंकजा मुंडे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार मदन भोसले या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.
ऊसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या कारखान्यांविरूध्द साखर आयुक्तालयाने आरआरसीची (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई सुरू केली आहे.
राज्यातील एकूण १९० साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीचे २१ हजार ४५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर अद्यापही १ हजार ४५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील २४ कारखान्यांकडेच ६५७ कोटी रुपये थकले आहेत.
राज्यातील १९० पैकी १०३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची पूण रक्कम अदा दिली आहे. निम्म्याहून अधिक एफआरपी रक्कम देणारे ८१ कारखाने आहेत. तर चार कारखान्यांनी निम्म्याहून कमी आणि दोन कारखान्यांनी एक दमडीही दिलेली नाही.
सातारा जिल्ह्यातील किसनवीर कारखाना आणि लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर शुगर या दोन कारखान्यांचा त्यात समावेश आहे. एफआरपीची मोठी रक्कम थकल्याने आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी संबंधित कारखान्यांनी जप्तीची नोटीस बजावली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुभाष देशमुख यांच्या कारखान्यासह सर्वाधिक ११ कारखान्यांचा समावेश आहे.
साखर जप्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना आरआरसी नोटीस बजावली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या कारखान्यांमधील साखर जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी थकलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
जप्तीची नोटीस बजावण्यात आलेले जिल्हानिहाय कारखाने :
सोलापर जिल्हा : लोकमंगल ॲग्रो, लोकमंगल शुगर्स, श्री विठ्ठल वेणूनगर, विठ्ठल रिफाइंड शुगर, सिद्धनाथ शुगर, गोकूळ माऊली शुगर, जयहिंद शुगर, भीमा टाकळी, गोकूळ शुगर्स, श्री. संत दामाजी कारखाना, मकाई भिलारवाडी.
बीड : वैद्यनाथ कारखाना परळी, जय भवानी गेवराई.
सातारा : किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज.
उस्मानाबाद जिल्हा : लोकमंगल माऊली शुगर-लोहारा, कांचेश्वर शुगर-मंगरूळ.
सांगली : एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट.
औरंगाबाद : शरद कारखाना पैठण.
लातूर : पन्नगेश्वर शुगर रेणापूर, श्री. साईबाबा शुगर औसा. नंदुरबार : सातपुडा तापी शहादा.
नाशिक : एस.जे. शुगर मालेगाव.
राज्यातील १९० कारखान्यांची एफआरपी स्थिती :
शेतकऱ्यांना देय एफआरपी : २२ हजार ८८८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : २१ हजार ४५४ कोटी (९३.६३ टक्के) प्रलंबित : १ हजार ४५८ कोटी (६.३७ टक्के)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज