मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी सदर बझार पोलिसांत कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भितीने डॉ. महास्वामी यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावर डॉ. महास्वामींचे वकील व सरकार पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला. उद्या (ता. 21) त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
सोलापूर जात पडताळणी समितीने खासदार डॉ. यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जोडलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला आहे.या निर्णयाविरुध्द डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने डॉ. महास्वामींना 8 एप्रिलपर्यंत दिलासा दिला असून त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबद्दल फेरपडताळणी होईल, असा विश्वास त्यांच्या वकिलांनी व्यक्त केला.
मात्र, तत्पूर्वी अक्कलकोट तहसिलदारांच्या फिर्यादीनुसार सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बझार पोलिसांत कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यावर सकृतदर्शनी डॉ. महास्वामी यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देवू नये, अशी विनंती सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग रजपूत यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर शुक्रवारी (ता. 20) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला असून आता त्यावर उद्या (शनिवारी) अंतिम निर्णय होईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज