टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर झारखंडमधून मंगळवेढा तालुक्यात आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नंदूर येथील शेतात ऊस भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असताना अचानक समोर आलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली.

या दुर्दैवी अपघातात चिमुरडीचा मृत्यू झाला असून, तिच्या जाण्याने मजूर वस्तीवर शोककळा पसरली आहे. पूजा सुरेश भुईया (वय ६, मूळ रा. बचकोमा, ता. छत्तरपूर, जि. पलामु, झारखंड) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

कसा घडला हा दुर्दैवी अपघात?
झारखंड येथील मिथलेश सुकन भुईया (वय ४३) हे गेल्या २० दिवसांपासून आपल्या गावातील अन्य १५ कोयत्यांसह ट्रॅक्टर मालक वैशाली महादेव डोणजे यांच्या ऊसतोड टोळीत काम करत आहेत.

त्यांच्यासोबत त्यांची सून शांतीदेवी आणि सहा वर्षांची नात पूजा ही देखील आली होती. २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नंदूर येथील गिरमल्ला मनगेणी यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती.
ऊस भरलेली ट्रॉली शेतातून बाहेर काढण्यासाठी चालक ट्रॅक्टर घेऊन येत असताना, खेळत असलेली चिमुकली पूजा अचानक ट्रॅक्टरसमोर पळत आली. रात्रीची वेळ असल्याने चालकाचे तिच्याकडे लक्ष गेले नाही आणि ट्रॅक्टरचे पुढील टायर व बंपर पूजाच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

वाहन न मिळाल्याने उपचारास विलंब
अपघातानंतर शेतात एकच आक्रोश सुरू झाला. जखमी पूजाला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात वेळेवर वाहन उपलब्ध होऊ शकले नाही.
अखेर कसेबसे खासगी वाहन मिळवून आई शांतीदेवी व अन्य मजुरांनी तिला २१ नोव्हेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता; डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
या हृदयद्रावक घटनेप्रकरणी आजोबा मिथलेश भुईया यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रॅक्टर चालक विठ्ठल खोबणा अरजनगी (रा. उंब्रज, ता. चडचण, जि. विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










