मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थ परिसरात नगरपरिषदेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या टाऊन हॉलला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

मंगळवेढा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून अनेक संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंद असलेली बाब म्हणजे २० डिसेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज दोन दिवस मंगळवेढा येथे मुक्कामी होते.

त्यामुळे शहराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सद्यस्थितीत शिवप्रेमी चौकात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

हा परिसर ‘शिवतीर्थ’ म्हणून ओळखला जात असून शिवभक्तांसाठी तो श्रद्धेचे स्थान बनला आहे. अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून टाऊन हॉलची उभारणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर या टाऊन हॉलला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ असे नाव देणे ही काळाची गरज असून त्याद्वारे शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा सन्मान होईल, तसेच भावी पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही केवळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचीच नव्हे तर समस्त मंगळवेढेकरांची भावना असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांच्याकडे निवेदन सादर करताना नगरसेविका सीमाताई बुरजे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मागणीवर नगरपरिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













