टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आज दि.२ ते २० फेब्रुवारीपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दि.१० ते २९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्षातील हजेरी ७५ टक्क्यापेक्षा कमी असू नये, असा नियम आहे. पण, काही अडचणीमुळे हजेरी कमी लागली असल्यास त्या विद्यार्थ्यास परीक्षेसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधित शाळांनी हजेरी क्षमापित करण्यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणे जरूरी आहे. त्याची मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख जवळ आल्याने प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य बोर्डाकडून २४ जानेवारी रोजी वाटप केले जाणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशाला (अक्कलकोट, मोहोळ व सोलापूर शहरासाठी), सुलाखे हायस्कूल, बार्शी (बार्शी, माढा व करमाळा तालुक्यासाठी)
आणि कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर (पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस व सांगोला तालुक्यांसाठी) येथे साहित्य पाठविले जाणार आहे.
बोर्ड परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण आता ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला कळवावे लागणार आहेत.
त्यानंतर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. दरम्यान, शाळांनी आता विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घ्यायला सुरवात केली आहे.
हजेरी क्षमापित करणे म्हणजे काय?
बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षभरातील हजेरी किमान ७५ टक्के (प्रथम सत्रातील शाळा सुरू झाल्यापासून १५ ऑक्टोबरपर्यंत व द्वितीय सत्रात १६ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंत) असणे बंधनकारक आहे. ६५ ते ७५ टक्क्यापर्यंत हजेरी असलेल्या त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी की नाही, याचा प्रस्ताव संबंधित शाळांनी पुणे बोर्डाच्या विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना पाठवायचा असतो. त्यासोबत गैरहजेरीची कारणे देखील द्यावी लागतात.
तर ६५ टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या अध्यक्षांना पाठवावे लागतात. त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील निर्णय तेच घेतात. बोर्डाच्या अध्यक्षांना शाळांनी दिलेली कारणे रास्त वाटल्यास त्यांच्याकडून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते.
सरमिसळ पद्धतीमुळे चिंता वाढली
प्रचलित परीक्षा पद्धतीने एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच केंद्रावर एकामागे एक यायचे. त्यामुळे एकमेकांचे बघून उत्तरे लिहण्याचे प्रकार व्हायचे. बोर्डाकडे प्राप्त तक्रारीवर उपाययोजना म्हणून यंदापासून आता परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यामध्ये एकाच शाळेतील मुले आता वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील.
विद्यार्थ्याच्या समोरील व मागील विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधील असणार आहेत. त्यामुळे अभ्यासात हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांबद्दल व शाळेच्या एकूण निकालाबद्दल आतापासूनच मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना विशेषत: गणित, विज्ञान, इंग्रजी शिक्षकांची चिंता वाढली आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज