टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक पाऊल उचलण्यात येत आहेत. प्रत्येक गावात तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून या समितीच्या माध्यमातून परराज्यातून, परजिल्ह्यातून गावात येणाऱ्या प्रत्येकांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.
शहरातील कोरोना नियंत्रणात येत असताना ग्रामीण भागातील अद्यापही रुग्णसंख्या व मृत्यूदरही वाढत आहे. त्यासाठी दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या समितीचे अध्यक्षपद हे तलाठ्यांकडे देण्यात आले आहे. सचिव पदावर ग्रामसेवक असणार आहेत. या समितीत विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गट अध्यक्षा, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या समितीच्या माध्यमातून परराज्यातून, परजिल्ह्यातून गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर तयार करुन गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे.
बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीची तपासणी स्थानिक, खाजगी डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्याडून करुन घेण्यात यावी. तपासणीत कोरोना सदृश लक्षणे न आढळल्यास त्या व्यक्तीस होम क्वाँरटाईन करावे.
होम क्वाँरटाईन करताना त्या व्यक्तीचे स्वतंत्र घर हवे. गावातील व्यक्तीला दोन घरे असल्यास एका घरात मुळ गावची व्यक्ती व दुसऱ्या घरात बाहेरून आलेली व्यक्ती राहील. तसेच गावच्या व्यक्तीला एकच घर असल्यास बाहेरुन आलेल्या व्यक्तीला ते घर देऊन आधीच गावी असलेल्या व्यक्तींनी जवळच्या नातेवाईकांकडे राहावे.
दोन्ही सोय न झाल्यास गावपातळीवरच त्या व्यक्तीस क्वाँरटाईन करण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास पहिल्यावेळी एक हजार रुपये दंड व दुसऱ्या वेळी २ हजार रुपय दंडाची कारवाई करावी. अन्यथा थेट आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावे.
कारवाई करण्याचे अधिकार तलाठी, ग्रामसेवक व मुख्याधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आदेश काढण्यात आलेला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज