मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोन्याच्या हव्यासापोटी सुवासिनी महिलेवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख चोरून नेल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील प्रभावती रामचंद्र कोरे यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले,
तर शुक्रवारी सकाळी त्यांची रक्षा चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे मयत कोरे यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दोन महिन्यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.
पंढरपूर येथील हिंदू स्मशानभूमीत प्रभावती रामचंद्र कोरे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणची सर्व राख गायब असल्याचे नातेवाईकांना समजले.
शनिवारी तिसरा दिवस असून त्या दिवशीचे विधी कसे करायचे असा प्रश्न कोरे कुटुंबीयांपुढे उभा राहिला आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही नाही, सुरक्षा रक्षक नाहीत. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत.
माजी नगराध्यक्षांच्या मावशीची रक्षा गेली होती चोरीला
दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील माजी नगराध्यक्षांच्या मावशीची रक्षा अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरीला गेल्याचे समोर आले होते. तिसऱ्या दिवशीच्या विधी करण्यासाठी गेलेले नातेवाईक विधी न करताच परत आले होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच नगरपालिकेवर मोर्चा काढून सीसीटीव्ही बसवणे व सुरक्षा रक्षक नेमणुकीची मागणी केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज