टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयातील शिबिरासाठी बोलावण्यात आले होते.
दोन महिन्यानंतर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी न पाठवता जिल्ह्यातील इतरत्र असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी सहाजण शिबिरातून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील २५ पोलीस ठाण्यातून निवडलेल्या ३० कर्मचाऱ्यांना शिबिरासाठी सोलापुरातील मुख्यालयात बोलावून घेतले होते.
वास्तविक पाहता हे शिबिर १४ दिवसांचे असते.मात्र शिबिराचा कालावधी ठरवण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक यांना असल्याने ते कधीपर्यंत चालणार, याची उत्सुकता कर्मचाऱ्यांना लागून होती.
मुख्यालयातील आणखी सहाजण बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही कर्मचारी हे ५५ वर्षांच्या पुढील असल्याने त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना पुन्हा आहे त्याठिकाणी पाठवले जाणार आहे की काय? अशी चर्चा केली जात आहे.
सुटलो बाबा एकदाचा…
शिबिरासाठी म्हणून मुख्यालयात बोलावण्यात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा पोलीस स्टेशनला केव्हा पाठवणार, याची चिंता लागली होती. पोलीस अधीक्षकांनी २२ जणांना मूळ पोलीस स्टेशन सोडून इतरत्र बदली केल्यानंतर अनेकांनी सुटलो बाबा एकदाचा, असे म्हणत नि:श्वास टाकला.
२२ जणांना करकंब, पांगरी, टेंभूर्णी, मोहोळ, पंढरपूर, पंढरपूर ग्रामीण, सांगोला, अक्कलकोट दक्षिण, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, मंद्रुप, कामती, बार्शी, मंगळवेढा याठिकाणी बदली करण्यात आली आहे.(लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज