टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा केंद्राचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.
केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाचवेळी
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (डिसेंबर 23 ते मार्च 2024) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे.
पीएम किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.
यवतमाळ येथील कार्यक्रमात होणार वितरण
यवतमाळ येथे होणाऱ्या या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार,
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.
2019 पासून शेतकऱ्यांसाठी खास योजना
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येते.
पीएम किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. आता सोळावा हप्ता उद्या जमा होणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. 1943.46 कोटीचा लाभ राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
राज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज