
मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । द्राक्ष विक्रेत्या महिलेकडे बनावट नोटा खपवणार्या दोघा संशयितांना शेंद्री-वांगरवाडी फाट्यादरम्यान ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याचा प्रकार शनिवारी (दि.14) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला. दोघे संशयित बीड जिल्ह्यातील असल्याचे समजते. दरम्यान, या दोघा तरुणांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे बनावट नोटा तयार करणारे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी सरकारची ‘ही’ योजना जाहीर
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-लातूर राज्यमार्गावरील कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील शेंद्री (ता. बार्शी) येथील फाट्यावर काही महिला द्राक्षे विक्रीकरिता बसलेल्या होत्या.दरम्यान, दुपारच्या सुमारास कुर्डूवाडी शहराच्या दिशेने दुचाकीवरून आलेले दोन तरूण द्राक्षे खरेदी करण्यासाठी शेंद्री फाट्यावर थांबले. तेथे त्या तरूणांनी एका महिलेकडून द्राक्षे खरेदी केल्यानंतर संबंधित तरूणाने शंभर रुपयांची नोट त्या महिलेला दिली. दरम्यान, द्राक्षे विक्रेत्या महिलेने ही शंभर रुपयाची नोट तपासून पाहिली असता ती नोट बनावट असल्याची शंका त्या महिलेला आली. त्यामुळे त्या महिलेने संशयित तरूणांना नोट बदलून द्या, नोट खोटी असल्याची शंका येत असल्याचे सांगितले. तेव्हा हे तरूण घाबरून लगेच दुचाकीवरून पुन्हा कुर्डूवाडी शहराच्या दिशेने पळून जाऊ लागले. तेव्हा घटनास्थळी उपस्थित स्थानिक दुसर्या तरूणांनी या संशयित तरूणांचा दुचाकीवरून पाठलाग करून त्यांना पकडले.
-मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा,सात जणांवर गुन्हे दाखल
त्या तरूणांजवळील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये शंभर रुपयांच्या नोटांचे सुमारे 15 बंडल असे दीड (लाख रुपये) मिळून आले. त्यानंतर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेथून त्या दोन संशयित तरूणांना तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. या दोघांना ताब्यात घेऊन मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत.दरम्यान, नोटांची तपासणी सुरू आहे.तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Advt







बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












