टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.
यांपैकी 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारीचा आलेखदेखील सर्वांसमोर मांडला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरमधील गुन्हेगारीत घट झाल्याचे समजत आहे.
राज्यात पोलीस हवालदार पदाची एकूण 12 हजार 500 पद भरली जाणार आहे.यापैंकी पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदे भरली जाणार आहे. यासंदर्भात युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिले जातील.
तसेच मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार आहे. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे.
दरम्यान, नागपूर शहरातील गुन्हेगारीच्या आलेख बाबत अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. नागपूरमध्ये गेल्यावर्षी 90 हत्या, 147 चोरी, 56 सोन साखळी चोरीची नोंद झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपूरमध्ये 88 हत्या, 127 चोरी, 21 सोन साखळी चोरीच्या तक्रारी आल्या आहेत.
त्याचप्रमाणे बलात्काराच्या घटनेतही घट झाली आहे. नागपूरमध्ये गेल्यावर्षी 163 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. तर, यावर्षी 152 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.
महाराष्ट्र पोलिसांना गस्तीसाठी मदतगार ठरेल अशा सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कुटर्स पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यासाठी गृहप्रशासन प्रयत्नशील आहे.
आज मी स्वतः ही स्कुटर चालवून तिच्या गुणवत्तेची व कार्यक्षमतेची पाहणी केली. या सुक्टर्समुळे पोलीस दल निश्चितच गतिमान होईल, अशा आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी आज केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज