टीम मंगळवेढा टाईम्स।
डॉ.ऋचा हीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉ. सूरज रूपनरला अटक करण्यास विलंब केल्याबद्दल पंढरपूर येथील संतप्त डॉक्टर संघटना, सामाजिक संघटना, नातेवाइकांनी पोलिसांवर एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार करीत सांगोल्याच्या पोलिस निरीक्षकांना चांगलेच धारेवर धरले.
सांगोला पोलिस हाय.. हाय.. च्या घोषणा देत पोलिस निरीक्षकांच्या कक्षेत ठिय्या मारला. काही वेळ गोंधळ उडाला. रात्री उशिरापर्यंत डॉक्टर पोलिस स्टेशनसमोर तळ ठोकून होते.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील कारंडे, निमा संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन सांगोला, होमिओपॅथिक संघटना पंढरपूर यांच्यातर्फे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माता बालक प्रतिष्ठानच्या डॉ. संजीवनी केळकर, डॉ. उषा देशमुख, डॉ. धीरज पाटील, पंढरपूर अर्बन व्हा. चेअरमन रा.पा. कटेकर, डॉ. मिलिंद जोशी, फिर्यादी ऋषिकेश पाटील, पंढरपूर येथील मृत डॉ. ऋचा हिचे नातेवाईक, उबाठा शिवसेना शहरप्रमुख तुषार इंगळेसह डॉक्टर मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची समजूत काढली. लवकरच आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले.
भाऊसाहेब रुपनर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉ. सूरज रूपनर यांचे वडील, फॅबटेक उद्योग समूहाचे चेअरमन भाऊसाहेब रूपनर यांना पोलिसांनी रात्री ८:३० वाजता कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
याप्रकरणी विधान परिषद उपसभापती आ. नीलम गोहे, खा. प्रणिती शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी फोनवरून पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याकडून डॉ. ऋचाच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती घेऊन राजकीय दबावाला न जुमानता आरोपी डॉ. सूरज रूपनर यास तत्काळ अटक करावी, अशा सूचना केल्या.
घटना घडल्यानंतर मृत डॉ. ऋचा रूपनर यांचे शवविच्छेदन होण्यास झालेला विलंब, अंत्यसंस्कार व त्यानंतर नातेवाइकांकडून फिर्याद देण्यास वेळ गेल्यामुळे आरोपीला अटक करता आली नाही. डॉ. सूरज रूपनर यांच्या अटकेसाठी पोलिस अधिकाऱ्यांची दोन पथके रवाना केली आहेत.- भीमराव खणदाळे, पोलिस निरीक्षक
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज