टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूरचे प्रातांधिकारी सचिन ढोले यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांच्या जागी आपलीच वर्णी लागावी, यादृष्टीने अनेकांनी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
महसूलचे प्रांताधिकारी गजानन गुरव व कोल्हापूरचे प्रांताधिकारी अमित माळी यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु, ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याने मुंबईतून फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात आहे.
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही कोरोनामुळे महसूल प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या मागील वर्षी होऊ शकल्या नाहीत. 28 डिसेंबर 2017 मध्ये सचिन ढोले यांच्याकडे पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता.
त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून आता जुलैअखेरीस अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांकडे पंढरपूर, मोहोळ या तालुक्यांची जबाबदारी आहे.
दक्षिणेची काशी म्हणून जगविख्यात श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर आणि तर दुसरीकडे अवैध वाळू उपसा अशा दोन कारणांनी हे प्रांत कार्यालय नेहमीच चर्चेत राहिले आहे.
त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी म्हणून ठाण्यातील परीविक्षाधीन कालावधीत काम करणाऱ्या महिला अधिकारी मुंबईतून प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, महसूलचे प्रांताधिकारी गुरव आणि मोहोळचे तत्कालीन तहसीलदार अमित माळी यांच्यासह जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनीही त्या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, माळी यांना त्यासंदर्भात विचारणा झाली होती. त्यांचा कोल्हापुरात आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांनी तूर्तास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाचे कामकाज गतिमान करून सर्वसामान्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागावेत, यासाठी अधिकाऱ्यांची पदे भरलेली असावीत. परंतु, मागील एक-दीड वर्षापासून जिल्हा प्रशासनातील चिटणीस, सर्वसाधारण, संजय गांधी निराधार योजना आणि कडा या विभागाचा कारभार पदभारींवरच सुरू आहे.
त्या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळावेत अशी मागणी जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाकडे यापूर्वीच केली आहे. त्यामुळे आता जुलैअखेरीस होणाऱ्या बदल्यांमध्ये चार नवे तहसीलदार सोलापूर जिल्ह्यासाठी मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज