मंगळवेढा टाईम्स टीम ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाने हस्तगत केली आहे. नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांच्याशी सत्काराच्या निमित्ताने मंगळवेढा नगरपालिकेतील नगरसेवकांनी सध्या जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यामुळे आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे किती नगरसेवक आमदार समाधान आवताडे यांच्या पर्यायाने भाजपच्या गळाला लागतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेनेत असलेल्या समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा नगरपालिकेची मागील निवडणूक लढवण्यात आली होती. त्यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आला होता.
त्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची जागा आवताडे यांनी भारतीय जनता पक्षाला देऊ केली होती. पण नगराध्यक्षपदासह 12 जागा ताब्यात घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा गड राखला होता.
विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार होते. अशा परिस्थितीत भालके यांनी ती किमया साधली होती.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकद लावूनही शहरात 4337 मते राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना कमी पडली आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य पाहता आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीत नगरपालिका ताब्यात घेणे भाजप नेत्यांना शक्य वाटू लागले आहेत, त्यामुळे आमदारांनी त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी नगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीला नगराध्यक्षा, पक्षनेते व काही नगरसेवकांनी गैरहजेरी लावली होती. मात्र, काँग्रेसचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी आमदार आवताडे यांचे स्वागत केले होते.
तो सत्कार हा राजकीय शिष्टाचाराच्या भाग असला तरी त्याची चर्चा मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच कोळी समाजाच्या वतीने भाजप आमदार आवताडे यांचा सत्कार करण्यात आला.
कॉंग्रेसचे नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांचे बंधू बाबा नाईकवाडी यांनी हा सत्कार केला. मात्र, या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पांडुरंग नायकवडी, सचिन शिंदे, दीपक माने, शशिकांत चव्हाण, गौरीशंकर बुरकूल, सरोज काझी, फिरोज मुलाणी, कैलास कोळी, ज्ञानेश्वर भगरे, दत्तात्रेय भोसले, युवराज शिंदे, युवराज घुले, हरीभाऊ कोळी यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुका या वेळेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिकेच्या त्या निवडणुकीपर्यत किती नगरसेवक व समर्थक हे आमदारांच्या गळाला लागतात, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज