टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोटारसायकलच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुलाने आपल्याच घरातील रोख रक्कम आणि सोन्या- चांदीचे दागिने चोरल्याची घटना तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओंकार प्रमोद जाधव (वय 20) यास अटक केली आहे.या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील मातोश्री नगरमध्ये फिर्यादी निर्मला प्रमोद जाधव या राहतात.
मंगळवारी, 22 डिसेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी पावणेपाच यादरम्यान निर्मला जाधव यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले फूल, 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, पायातील जोडवी असा 92 हजार रुपये किमतीचा ऐवज पळवून नेला होता.
या प्रकरणी निर्मला जाधव यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी तपास करून या प्रकरणी फिर्यादी निर्मला जाधव यांचा मुलगा ओंकार याच्याकडे चौकशी केली.
तेव्हा चौकशीमध्ये ओंकार जाधव यानेच मोटारसायकल घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी घरातील पैसे आणि दागिने चोरल्याचे कबूल केले.
ओंकार जाधव याने स्वतःच्या घरातून चोरलेल्या रकमेपैकी 41 हजार 200 रुपये हप्त्यापोटी भरले आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली. त्याने उर्वरित रकमेपैकी आठ हजार 200 रुपये रोख आणि घरात लपवून ठेवलेले सर्व दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील आणि पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तासाच्या आत पंढरपूर तालुका पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावला.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज