टीम मंगळवेढा टाईम्स ।
खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी अशा विविध गुन्ह्यांमध्ये मागील आठ वर्षांपासून फरार असलेल्या सपाल्या उर्फ हनुमंत भिमशा शिंदे (वय.४०,रा.जामगाव, ता.मोहोळ) या दरोडेखोरास सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बॉर्डरलगत जेरबंद केले.
त्याच्यावर घरफोडीचे ७, मोटरसायकल चोरीचा १ असे एकूण ८ गुन्हे होते. त्याच्याकडून ८ लाख ४९ हजार रुपये किमतींच्या सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आठ वर्षापासून फरार असलेला आरोपी मौजे टाकळी (ता.मिरज,जि.सांगली) येथे त्याच्या नातेवाईकाकडे आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती.
त्यानुसार वेशांतर करून त्याच्या येण्याजाण्याच्या मार्गावर तसेच दारू पिण्यासाठी येत असलेल्या ठिकाणी सापळा लावण्यात आला.पत्नीच्या औषध उपचाराकरिता टाकळी गावातील दवाखान्यात आले असता त्यास ताब्यात घेण्यात आले.
मंगळवेढा पोलीस स्टेशन, कामती पोलीस स्टेशन,मंद्रूप पोलीस स्टेशन, वळसंग पोलीस स्टेशन ,कामती पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा पुर्वेतिहास व माहिती घेतली असता तो वेळोवेळी टोळी व टोळीतील सदस्य बदलून सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरलगत कर्नाटक भागात दरोडे , जबरी चोरी , घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली.
मौजे वाघोली, बेगमपूर, कोरवली, औराद , भंडारकवठे, लवंगी आदी गावांमध्ये घरफोडी केले असल्याची कबुली त्याने दिली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे , मोहन मनसावाले , धनराज गायकवाड , अक्षय दळवी , समीर शेख , महिला पोलीस अंमलदार मंजुळा धोत्रे , ज्योती काळे या पथकाने ही कामगिरी बजावली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज