मंगळवेढा टाईम्स टीम । कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर येथे एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून हत्या केली. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. Kolhapur Ichalkaranji tortured and killed Chimukali
संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचे आमिष दाखवून काल सायंकाळी खांद्यावरून उचलून परिसरातील निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिला तेथील गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकले. त्यानंतर सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ही अल्पवयीन मुलेही त्यांच्या सोबत होती , पण काहीही माहिती दिली नाही.
नंतर त्या मुलांनी विहिरीमध्ये मुलगी पडली असल्याचे सांगितले. तत्काळ नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. तर त्या ठिकाणी मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असल्याचे निदर्शनास आल्याने चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या घटनेला वाचा फुटली व त्यांनी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली.
यानंतर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पाहणी केली. संबंधित अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोस्टमार्टेमसाठी लिंगायत स्मशानभूमीत दफन केलेला पीडित मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज