टीम मंगळवेढा टाईम्स।
वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज 4 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.
विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने जुळे सोलापुरातील बाँबे पार्कनजीक उभारलेल्या विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट (वि. के. वयम्) या प्रकल्पाचे आज 4 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे.
आज सकाळी 10.30 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.
यावेळी विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णन् यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यानिमित्त आज 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे यांनी दिली.
उद्घाटन समारंभास केंद्राचे प्रांतप्रमुख अभय बापट, प्रांत संचालक किरण कीर्तने, नगर संचालक दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त दररोज सायंकाळी 6.30 वाजता प्रकल्प स्थळावर (विवेकानंद केंद्र वयम्, बाँबे पार्कनजीक, जुळे सोलापूर) येथे व्याख्यान होणार आहे.
आज 4 मार्च रोजी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक, सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांचे विवेकानंद विचारांची प्रासंगिकता, 5 मार्च रोजी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचे स्वराज्य 75 या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तर 6 मार्च रोजी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व विवेकानंद केंद्राचा सुवर्ण महोत्सव या विषयावर व्याख्यान होईल.
शिवप्रेमी अडवणार राज्यपालांची वाट! रास्ता रोको, आंदोलनाच्या इशाऱ्याने पोलिस अलर्ट
राज्यपालांनी मागावी जाहीर माफी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि राज्यातील सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.
त्याशिवाय त्यांना राज्यात कुठेही कार्यक्रम करू देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी आजच्या बैठकीच्या निमित्ताने दिला आहे. राज्यपालांनी माफी मागेपर्यंत त्यांचा निषेध नोंदविला जाईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, विमानतळावर महिलांसह शिवप्रेमींची मोठी गर्दी असेल. तसेच विमानतळावरून येणाऱ्या रस्त्यावरही शिवप्रेमी त्यांचा निषेध करतील. त्यांचा दौरा होईपर्यंत शिवप्रेमी जागोजागी रास्ता रोको करतील, असाही इशारा काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनासंदर्भात माहिती घेऊन चोख बंदोबस्ताचे नियोजन केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज