टीम मंगळवेढा टाईम्स ।
सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अन्य ठेवीदारांना ठेवीवर 12 ते 13 टक्के व्याज देणार असल्याचे आमिष दाखवून ठेवलेल्या ठेवीची मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत न देता फसवणुक व विश्वासघात केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील श्री गजानन नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 16 संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पतसंस्था क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रानी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रकाश ज्ञानेश्वर जडे (वय 71) हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते 30 नोव्हेंबर 2008 साली सेवानिवृत्त झाले. दरम्यान सेवानिवृत्तीनंतर फिर्यादीस 20 लाख एवढी रक्कम मिळाली होती.
यातील पतसंस्थेचे चेअरमन डॉ.मोहन कुलकर्णी, संचालक विश्वास देशमुख (वकील), डॉ.मधुकर कुंभारे, डॉ.श्रीकांत मर्दा यांच्या व अन्य संचालक तसेच पतसंस्थेचे शाखाधिकारी भारत कुलकर्णी यांनी 2010 मध्ये फिर्यादीच्या घरी येवून भेट घेवून तुमची मिळालेली रक्कम आमच्या
श्री गजानन नागरी पतसंस्थेत 13 महिन्याच्या मुदतीवर फिक्स (एफ.डी.) मध्ये ठेवा. त्यावर तुम्हाला 12 टक्के प्रमाणे द.सा.द.से 12 टक्के प्रमाणे व्याज मिळेल असे सांगून जादा व्याज दराचे आमिष व प्रलोभन दिले.
यावर फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबानी विश्वास ठेवून एकूण 18 लाख 5 हजार रक्कम मुदत ठेवीवर ठेवली. त्याची मुदत संपल्यानंतर रक्कम काढण्यासाठी गेलो असता शाखाधिकार्यांनी टाळाटाळ व उडवाउडवी करून ती रक्कम परतावा न करता फिर्यादीचा विश्वासघात केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्याचप्रमाणे सुभाष दुरुगकर व मधुकर राक्षे यांचेही रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने दि.11 जून 2009 ते 2 मार्च 2013 या कालावधीत रक्कम पतसंस्थेत ठेवली होती.
दरम्यान ठेवीदारांचे ठेवलेली पैशांची मुदत संपून सुद्धा पैसे परत न देता फसवणुक करून विश्वासघात केल्याप्रकरणी शाखाधिकारी भरत कुलकर्णी, चेअरमन डॉ.मधुकर कुंभारे, संचालक डॉ.मोहन कुलकर्णी, अॅड.रघुनाथ देशमुख,
डॉ.श्रीकांत मर्दा, रामचंद्र कुलकर्णी, दत्तात्रय नेने, मनिषा महालकरी, विश्वास देशमुख, बाळासाहेब नाईकवाडी, सदाशिव जामदार, संध्या कोंडुभैरी, दाजी डांगे,
राजाराम डोईफोडे (सर्व रा.मंगळवेढा) अर्जून खांडेकर (निंबोणी), महादेव माळी (निंबोणी) आदि 16 संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत. दरम्यान यातील फिर्यादी प्रकाश जडे यांनी मंगळवेढा पोलिसात तक्रार दिली होती मात्र ती दाखल न केल्याने पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली होती.
या तक्रारी अर्जावरून मंगळवेढा पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश केल्यानंतर दि.23 डिसेंबर रोजी या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज