टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर- सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधून गेलेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये देण्यासाठी 7 हजाराची लाच स्विकारून तलाठी आरोपी सुरज रंगनाथ नळे लाचेची रक्कम घेवून फरार
तर झिरो कर्मचारी तथा आरोपी पंकज महादेव चव्हाण (वय 22 रा.शेलेवाडी) याला पोलिसांनी केले जेरबंद. दरम्यान झिरो कर्मचार्यास न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलिस कोठडी.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 51 वर्षीय फिर्यादी शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या मालकीची कमलापूर ता.सांगोला येथील गट नं.52 मधून सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 गेला आहे.
सदर जमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली असून पाईपलाईनची शासकिय किंमत 1 लाख 43 हजार 794 रुपये इतकी मंजूर झाली होती. तक्रारदार यांच्या मित्राच्यावतीने पाठपुरावा करीत असताना यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने तलाठी तथा आरोपी नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती 7 हजार रुपये लाचेची मागणी करून सापळा कारवाईदरम्यान रक्कम आरोपी नळे स्विकारून त्याच्या स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच.13 सीएएस 5328) मधून दि.29 रोजी रात्री 10.15 वा.मेटकरी दवाखान्याजवळून फिल्मी स्टाईलने पळून गेले.
तदनंतर पोलिस पथकाने नळे यांच्या तुकाईनगरमधील घराजवळ सापळा आयोजित केला असता सदर ठिकाणी नळे हे त्यांच्या चार चाकी वाहनातून आले होते.
या दरम्यान अँटी करप्शनचे अधिकारी व अंमलदार यांनी थांबविण्याचा इशारा करूनही ते न थांबता त्यांच्या ताब्यातील चार चाकी गाडी अतीवेगाने कोणाच्याही जीवाची पर्वा न करता वेगाने वाहन चालवून रकमेसह पळून गेले.
यावेळी पोलिस अंमलदार सन्नके यांना घासून गाडी आरोपीने नेल्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दवाखान्यात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक गणेश कुंभार, पोलिस निरिक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार मुल्ला, घाडगे, सन्नके, उडानशीव आदीनी केली.
दरम्यान, मंगळवेढा प्रांत कार्यालय हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून सोलापूर-सांगली हा राष्ट्रीय महामार्ग गेल्यापासून येथे बाधित शेतकर्यांना टक्केवारीवर पैसे घेतल्याशिवाय बाधितांच्या रकमा न देता त्यांची अडवणूक करीत असल्याच्या या पुर्वीही अनेक तक्रारी बाधित शेतकर्यांच्या होत्या.
याबाबत वेळोवेळी रास्ता रोकोसारखे येथील वरिष्ठ अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनातील अतिवरिष्ठ अधिकार्यांनी याकडे गांभिर्यपूर्वक न पाहता येथील अधिकार्यांची पाठराखण केल्यानेच आजचा प्रकार घडल्याची खमंग चर्चा दिवसभर सुरु होती.
महामार्गातील बाधित शेतकर्यांच्या रकमा देण्यापोटी येथील अधिकारी व कर्मचार्यांनी लाखो रुपयांची वरकमाई केल्याची चर्चा या निमित्ताने रंगली असून या अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
जबाबदार अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी
आरोपी तलाठी सुरज नळे यापुर्वी ग्रामीण भागात सजेत कार्यरत असताना अधिकार्यांनी येथे खास त्याला टक्केवारी वसुलीसाठी ठेवण्यात आल्याचा बोलबाला सुरु असून शासनाची पगार घेवून जनतेची कामे करणे अपेक्षित असताना
संगणकाच्या कामाच्या नावाखाली टक्केवारी वसुल करणे कुठल्या कायदयाच्या चौकटीत हे काम बसत आहे. असा सवाल या घटनेनंतर जनतेमधून विचारला जातो आहे.
पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी याकामी लक्ष घालून येथील जबाबदार अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी लावून दुधाचे दुध व पाण्याचे पाणी करून सर्वसामान्य जनतेच्या मनातील शंका दूर करावी व गैरमार्गाने संपत्ती कमविणार्यावर कारवाई व्हावी अशी आग्रहाने मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज