टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यावर झालेल्या एका अपघातात वृद्ध कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तंबाखूच्या एका पुडीने हा मोठा घात केला आहे.
पंढरपूर-सांगोला, पंढरपूर आणि मोहोळ या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनांचे वेग देखील प्रचंड वाढले आहेत.
प्रत्येकाला घाई झालेली दिसत असून बेफाम वेगात वाहने धावत आहेत. रस्ता रुंदीकरण आणि सिमेंटचे रस्ते केल्यापासून या मार्गावरील वाहने प्रचंड वेगाने धावत आहेत.
कुणीही कुणाच्या प्राणाची पर्वा करताना दिसत नाही आणि आपल्याशिवाय अन्य कुणीतरी या रस्त्याचा वापर करीत असते याची साधी जाणीवही वाहनचालकांना उरलेली दिसत नाही.
वाहनांना वेग अधिक असल्याने अचानक अपघाताची परिस्थिती निर्माण झाली तर वाहन नियंत्रणात रहात नाही आणि अपघात होऊन दुसऱ्याचा जीव जात आहे परंतु तरीही या रस्त्यावर वाहने शिस्तीने धावताना दिसत नाहीत.
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर अनवली चौकात मंगळवेढा तालुक्यातील हाजापुर येथील ६५ वर्षे वयाच्या एका कामगारास अज्ञात वाहनाने उडवले आणि अपघात करून अंधाराचा फायदा घेत सदर वाहन पळून देखील गेले आहे.
अनवली चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक छोटीमोठी दुकाने आहेत त्यामुळे चौकात वर्दळ असते आणि अनेकजण सतत रस्ता ओलांडत असतात त्यामुळे येथे नेहमीच धोका जाणवत असतो.
येथे असलेल्या विठ्ठल गॅरेजमध्ये काम करणारे सोमनाथ अर्जुन साळुंखे हे ६५ वर्षे वयाचे कामगार रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तंबाखू पुडी आणण्यासाठी चौकातून पुढे निघाले असता ही घटना घडली.
गॅरेजमध्ये वेल्डिंगचे काम सुरु होते आणि हे काम सुरु असताना तंबाखूची पुडी आणण्यासाठी म्हणून ते निघाले असता वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडवले.
लोक धावले पण —
रात्री सव्वा नऊ वाजण्याची वेळ असली तरी चौकात गजबज होती. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच बाजूचे लोक मदतीला धावले आणि १०८ सेवेतील रुग्णवाहिका बोलावून सोमनाथ साळुंखे याना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु साळुंके यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मयत झालेले सोमनाथ साळुंखे हे मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथील रहिवासी होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज