मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना येथे गावातील काही महिला अनैतिक व्यवसाय करतात म्हणून पोलिसांत निनावी अर्ज दिल्याच्या संशयावरून १४ वर्षांपूर्वी एका दलित विवाहित महिलेला विवस्त्र करून तिची गावातून धिंड काढून बेअब्रू केल्याबद्दल गावातील नऊजणांविरूध्द भरण्यात आलेल्या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी सर्व आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
शिवाजी लक्ष्मण पाटील (वय ४९), बिभीषण लक्ष्मण पाटील (वय ४७), गणपत नामदेव पाटील (वय ४३),.अरूण बंडा जाधव (वय ३५), कमलाकर शामराव पाटील (वय ४०), बाळासाहेब सिद्राम माने (वय ५५), नितीन कोंडिबा पाटील (वय ३०),पार्वतीबाई बाळू पाटील (वय ३०) आणि सुभाबाई दिगंबर घाटे (वय ५५) अशी शिक्षा सुनावण्ंयात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या गाजलेल्या खटल्याची माहिती अशी की, सोलापूरपासूनच जवळच असलेल्या तेलगाव सीना गावातील काही महिला अनैतिक व्यवसाय करतात म्हणून पोलिसात निनावी तक्रारी अर्ज दाखल झाला होता. हा निनावी अर्ज यातील पीडित दलित महिलेनेच केला असावा, असा संशय घेऊन संतप्त आरोपी गावकऱ्यांनी ११ मार्च २००६ रोजी पीडित महिलेला तिच्या छोटय़ा मुलादेखत बेदम मारहाण केली.
एवढेच नव्हे तर तिला चक्क विवस्त्र करून तिची गावभर धिंड काढली होती. गावच्या चावडीसमोर तिला विवस्त्र अवस्थेत बसवून ठेवत तिची विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी तिने लहान मुलासह गावातून पळ काढत पोलीस ठाणे गाठले. परंतु सुरूवातीला पोलिसांनी दाद दिली नव्हती. नंतर हे प्रकरण प्रसार माध्यमांनी उचलून धरले, तेव्हा पोलिसांनी संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून विधिमंडळातही विरोधकांनी आवाज उठविला होता. राज्यात ्िठकठिकाणी या घटनेचे तीव्र पडसाद उमटून आंदोलनेही झाली होती. तेव्हापासून पीडित महिलेला शासनाने दिलेले पोलीस संरक्षण आजही कायम आहे.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. सरकारतर्फे अॅंड. आनंद कुर्डूकर व अॅदड. गंगाधर रामपुरे तर मूळ फिर्यादीतर्फे अॉड. संजीव सदाफुले व अॅरड. सिध्दांत सदाफुले यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे अॅलड. धनंजय माने यांनी बचाव केला. आरोपींकडून प्रत्येकी २७ हजार रुपये दंड वसूल झाल्यास ती सर्व रक्कम पीडित महिलेला द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज