टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक, बेरोजगार युवक-युवती तसेच महिलांना पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टलवर होणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आपला फार्मर आयडी व महा आयडी तयार करून ठेवावा, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, शेतकरी व पशुपालकांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार असून,

लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी किमान २४ तास अगोदर आवश्यक नोंदणी व कागदपत्रांची तयारी पूर्ण ठेवणे गरजेचे आहे.

या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना,

भज-क प्रवर्गासाठीच्या योजना, नऊ राज्यस्तरीय योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना तसेच अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या तीन योजनांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय योजनांमध्ये पाच दुधाळ गायी किंवा म्हशींचा प्रकल्प, ५० शेळ्या किंवा मेंढ्या व पाच नरांचा गट, पाच हजार अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, तीन हजार ते पाच हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प,

आठवड्याला एक हजार अंडी उबविण्याची क्षमता असलेले यंत्र, पाच माद्या व एक नर यांचा वराहपालन गट, मुरघास संयंत्र तसेच पशुसंवर्धन कर्जावरील व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे.

तर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक किंवा दोन दुधाळ जनावरांचे गट, पाच शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर, दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर, ५०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप, हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि मिनी टीएमआर उपकरणासाठी अनुदान अशा विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी आणि आर्थिक स्वावलंबन साधावे,
तसेच या योजनेची अधिक माहिती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया व आवश्यक मार्गदर्शनासाठी शेतकरी व पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











