मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सहकारी बँकांच्या संचालकांना सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत राहता येणार नाही, या केंद्र सरकारच्या निर्णयावर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी शिक्कामोर्तब केले.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती, त्यावर हा निकाल देण्यात आला. यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांसह इतर सहकारी बँकांत तळ ठोकलेल्या संचालकांना आता थांबावे लागणार आहे.

केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ मध्ये सुधारणा करत सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम करण्यावर निर्बंध आणले आहेत. मात्र, राज्य शासनाने मध्यंतरी एक परिपत्रक काढत तशा प्रकारची कारवाई करू नये, असे सहकार विभागाला सांगितले.

लातूर जिल्हा बँकेच्या आठ संचालकांविरोधात बँकेचे माजी कर्मचारी सतीश जाधव यांनी लातूर विभागीय सहनिबंधक व त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना अपात्र ठरवल्यावर राज्यभरातील सहकारातील नेत्यांची झोप उडाली.

बहुतांश बँकांत मातब्बर संचालक २५-३० वर्षे तळ ठोकून आहेत. सांगली, सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केलेल्या मातब्बरांचा कार्यकाळ दहा वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यास हरकतीही घेण्यात आल्या पण उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरवणे किंवा अर्ज नामंजुरीचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही, असा निकाल देण्यात आला.

पण याविरोधात चंद्रकांत कोकाटे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील औद्योगिक, विणकर गटातील अनिल देसाई यांच्या विरोधात तर संजय मोरे यांनी महाबळेश्वर तालुका विकास संस्था गटातील राजेंद्र राजपुरे यांच्या विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर, न्यायालयाने देसाई व राजपुरे यांचे अर्ज अवैध ठरवले.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांचाही कार्यकाळ दहा वर्षापेक्षा अधिक असल्याने न्यायालयाच्या निकालाचा त्यांच्या निवडीवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. कायद्यातील तरतुदीनुसार रिझर्व्ह बँक अपात्रतेबाबतची थेट कारवाई करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील हे दिग्गज येणार अडचणीत
कोल्हापूर (०९) : हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक, निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भैय्या माने, राजू आवळे, संतोष पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर.
सातारा (१०) : उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर, नितीन पाटील, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते, दत्तात्रय धमाळ, प्रभाकर घार्गे.
सांगली (०८) : मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, दिलीप पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, मोहनराव कदम, सुरेश पाटील व बाळासाहेब होनमोरे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















