मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
खाजगी शिक्षण संस्थांमध्ये बोगस संचमान्यता मिळविण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांच्या खरेदी-विक्रीचा धक्कादायक महाघोटाळा उघडकीस आला आहे.त्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि दलालांचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलं असून यामुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिक्षणाचं दान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं मात्र बीड जिल्ह्यात हेच शिक्षण क्षेत्र व्यवसायाचं साधन बनलं आहे.

बीडमधील संस्थाचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी चक्क विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याचं उघड झालं आहे. बीडच्या चंपावती खासगी शाळेत संचमान्यतेसाठी पटसंख्या फुगवण्यासाठी तब्बल दोनशेहून अधिक विद्यार्थी दाखवण्यात आले महत्त्वाचे म्हणजे त्यातील 3 विद्यार्थी चक्क उत्तराखंडचे आढळले आहेत.

बीडच्या चंपावती शाळेत प्रत्यक्ष हजेरीपटावर 973 विद्यार्थी आहेत. संचमान्यतेसाठी 1450 विद्यार्थी आवश्यक होते .शाळेच्या सरल पोर्टलवर 1268 विद्यार्थी दाखवण्यात आले म्हणजे 295 विद्यार्थी जास्त दाखवण्यात आले.

त्यात प्रिन्स विश्वकर्मा, अर्णव वर्मा आणि आर्यन चंद्रशेखर हे तीन विद्यार्थी उत्तराखंडचे असून त्यांना 28 सप्टेंबर रोजी खरेदी करून यू डाईस पोर्टलवर नोंद करण्यात आली. 30 सप्टेंबरला संचमान्यता पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबरला हेच विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात आले.

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या चौकशीत हा महाघोटाळा उघड
प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या चौकशीत हा महाघोटाळा उघड झाला असून त्याचा अहवाल चव्हाण यांनी थेट पुणे शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशींना निलंबित करण्यात आलं. या कारवाईनं जिल्ह्यातील बोगस संस्थाचालक आणि दलालांचे धाबे चांगलेच दणाणलेत. संचमान्यतेत शिक्षकांची पदं अतिरिक्त ठरू नयेत आणि नवीन बोगस तुकड्या मंजूर करून घेता याव्यात यासाठी बीड जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे.
खाजगी शाळा आणि संस्थाचालक
ऑगस्ट-सप्टेंबरच्या संचमान्यतेच्या काळात इतर राज्यांतील किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे UDISE आयडी वापरून कागदोपत्री प्रवेश दाखवतात. पटसंख्या फुगवली जाते, संचमान्यता मंजूर होते, शिक्षक पदं वाचतात किंवा नवीन पदं मिळतात नंतर तेच विद्यार्थी पुन्हा मूळ शाळेत परत जातात किंवा कागदावरच राहतात. यासाठी प्रति विद्यार्थी 5 ते 10 हजार रुपये वसूल केले जातात. मुख्य म्हणजे पालक आणि विद्यार्थी यांना या व्यवहाराची कोणतीही कल्पना नसते.
बीडच्या शिक्षण क्षेत्रातील काळा अध्याय
बीड जिल्ह्यात यू-डायसचा गैरवापर करून थेट शासनाच्या तिजोरीवर डल्ला टाकला जातोय. 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे सूत्र वापरून पदं टिकवली जातात. पण प्रत्यक्षात वर्ग रिकामे असतात. त्यामुळे बीडमधील शिक्षणसंस्था म्हणजे खरेदी-विक्रीचा बाजार झाला आहे. याआधी बीडमधील सामूहिक कॉपी प्रकरणानं शिक्षणक्षेत्रात खळबळ उडवली होती.आता थेट विद्यार्थ्यांच्या खरेदीविक्रीनं बीडच्या शिक्षणक्षेत्रातील काळा अध्याय समोर आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















