मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे घडली आहे.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझं नाव माईकवर का पुकारलं नाही?; लोखंडी रॉड असलेला माईक घातला डोक्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते.

विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला.

या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला.

या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.

या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













