टीम मंगळवेढा टाईम्स।
एकीकडे कडक उन्हामुळे शेतातील पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत, तर दुसरीकडे उजनी धरण भरलेले असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे माण नदीपात्रात पाणी सोडले जात नाही. या निषेधार्थ माण संघर्ष समिती आणि नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांनी पंढरपूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मल्लेवाडी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अखेर अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र हक्काचे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच मंगळवेढा पोलिसांनी ‘जमावबंदी आदेशाचा भंग’ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

’उजनी’ भरूनही पिके जळाली; प्रशासनाचे ‘सोयीस्कर’ दुर्लक्ष
गतवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. असे असतानाही प्रशासनाला शेतकऱ्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. कधी कालव्याला तर कधी नदीला पाणी सोडण्यास जाणीवपूर्वक उशीर केला गेला.

मे महिन्यातच माण संघर्ष समितीने उजनी कालवा क्रमांक ५२ च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, माण नदीत पाणी न सोडल्यास २ जून रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

महामार्गावर वाहनांच्या रांगा; ३ तासांनंतर प्रशासन नमले
मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शेकडो शेतकरी मल्लेवाडी जवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले. उजनीचे अधिकारी घटनास्थळी फिरकण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. तब्बल तीन तास पंढरपूर आणि विजापूरकडे जाणारी शेकडो वाहने अडकून पडली होती. अखेर दुपारी १२.३० वाजता अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत तात्काळ पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. “आज रात्रीपासूनच पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल,” अशी माहिती शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे यांनी दिली.

पाणी मागणाऱ्या ‘या’ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल:
मंगळवेढा पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि रस्ता अडवल्याप्रकरणी खालील प्रमुख कार्यकर्त्यांसह १० ते १५ अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

संजय पवार (घरनिकी), दीपक जाधव (सिद्धेवाडी)
बबन रोकडे (मुढवी), विवेक चौगुले (मल्लेवाडी),सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण मोरे, सिद्धेश्वर हेंबाडे (ढवळस), मारुती मस्के, आदिनाथ शिंदे (शिरगाव)
शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मरवडे येथेही शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. पिके वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या अन्नदात्याला गुन्हेगारासारखी वागणूक देणे अत्यंत संतापजनक आहे.-सिध्देश्वर हेंबाडे, शेतकरी नेते
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













