टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेलापूर येथून आलेली व्यक्ती म्हणाली मला कोरोनाची लागण झालीय माझ्यावर उपचार करा तो रुग्ण आपल्या मुलासह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णच समोर आल्याने येथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची चांगलीच धांदल उडाली.
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात आदर्शवत सेवा देणारे आरोग्य केंद्र म्हणून मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखले जाते. वेळोवेळी शासनाकडूनही या आरोग्य केंद्राला विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. चांगली अशीच सेवा मिळत असल्याने मरवडे परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची वर्दळ या दवाखान्यात असते. आजही सकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर तालुक्यातील खवे गावातील एक रुग्ण (वय 45) आपल्या मुलासह तेथे दाखल झाला. रुग्ण व मुलाने येथील वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत मी सकाळीच बेलापूर येथून आपल्या मूळगावी खवे (ता. मंगळवेढा) येथे आलो आहे.
माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, आता माझ्यावर उपचार करा, असे सांगितले. रुग्णाच्या या खळबळजनक विधानानंतर त्या रुग्णाबाबत सविस्तर माहिती विचारली असता आपण बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एका खाजगी लॅबचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तो रुग्ण सकाळीच बेलापूर येथून एक खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जवळा (ता. सांगोला) येथे आला व नंतर खवे येथे आला.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलासह मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असल्याचे त्याने सांगितले. रुग्णाची खातरजमा केल्यानंतर त्याला व त्याच्या कुटूंबियास सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुढील कार्यवाहीसाठी मंगळवेढा येथे पाठविण्यात आले. बेलापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण आपल्या मूळ गावीच कसा येतो याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मरवडे येथील आरोग्य केंद्रात कोरोना रुग्ण आला असल्याची कुणकुण लागताच येथे बाह्यरुग्ण विभागात आलेल्या इतर रुग्णात व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांत चांगलीच धांदल उडाली होती. मरवडे गावही तातडीने पुढील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेत गावबंद करण्यात आले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज