टीम मंगळवेढा टाईम्स ।
एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीची तुतारी फुंकली. भाववाढीचा कहर झाला आहे. अवघ्या चार दिवसांत सोने आणि चांदीने गेल्या चार महिन्यातील सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. सोने या चार दिवसांत 2300 रुपयांनी तर चांदीने 4,000 रुपयांचा टप्पा गाठला.
देशातील सुवर्णपेठ सोलापूर जिल्ह्यामध्ये जीएसटीसह सोने 72,000 रुपयांच्या घरात पोहचले. देशातील मोठ्या मोठ्या सराफा पेठेत जवळपास असाच भाव आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला आहे. मौल्यवान धातूंनी दरवाढीचा गिअर टाकल्याने सराफा बाजारात यावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
सोने आणि चांदीतील दरवाढीची अशी आहे अपडेट
चार दिवसांत 2300 रुपयांची वाढ– मार्च महिन्यानंतर सोन्याने एप्रिलच्या चारच दिवसांत दरवाढीची तुतारी फुंकली. मार्च महिन्याच्या शेवटच्या सत्रात मौल्यवान धातूत 2000 रुपयांची उसळी आली होती.
या 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची भरारी घेतली. 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी उसळले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी दर वाढले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा चौकार – मार्च अखेरीस चांदी 1100 रुपयांनी महागली होती. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदीने टॉप गिअर टाकला.
1 एप्रिलला 600 रुपयांनी चांदी महागली. 2 एप्रिलला त्यात 400 रुपयांची भर पडली. 3 एप्रिलला बेशकिंमती धातूने 2 हजारांची जोरदार मुसंडी मारली. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती उसळल्या.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 82,000 रुपये मोजावे लागणार आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली.
24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 77,594 रुपये झाला.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
स्पॉट मार्केट बरोबरच वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत आहे
स्पॉट मार्केट बरोबरच वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,297 डॉलर आणि चांदीचा दर 27.05 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता यावर्षी व्याजदरात कपात करणे आवश्यक ठरणार आहे.
यामुळे बर्याच गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी केली असल्याचे सांगितले जाते. व्याजदरात कपात केल्यानंतर डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्याऐवजी सोन्यातील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार व्याजदर कपात झाल्यानंतर सोन्याची खरेदी करतात. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढण्याचे शक्यता असते.
काही विश्लेषकांनी सांगितले की, रशिया – युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दरही वाढत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये औद्योगिक दृष्टया महत्त्वाच्या तैवानमध्ये मोठा भूकंप घडला आहे. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे सध्या तरी वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज