टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे गायी, बैल, गुरं यांना मान दिला जातो. बैलांसाठी बैल पोळा तर गायीसाठी आपल्याकडे वसुबारस हे सण साजरे केले जातात.
वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळी का साजरी केली जाते हे बहुतेकांना माहीत असले तरी अनेकांना याची सुरुवात गायींच्या पूजेने होते हे माहीत नसेल.
यावर्षी 21 ऑक्टोबरला वसुबारसचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानले जाते.
या दिवसाला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. खरं तर वसुबारस हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. गायी आणि वासरांना मान देण्यासाठी हा सण साजरा करतात.
या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे. ज्या काळात देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत किंवा जादुई अमृत शोधण्यासाठी धडपडत होते.
या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे.
दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी संबंधित आहे. वसुबारसची पूजा वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तयार व्हावे.
त्यानंतर दारात रांगोळी काढून आणि तोरण बांधून अंगण सुशोभित करावे. त्यानंतर गायीच्या पायावर पाणी घालतात आणि नंतर हळद-कुंकू, अक्षता वाहून गायीचे औक्षण करतात आणि नंतर नैवेद्य दाखवतात.
काही ठिकाणी यादिवशी तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात.
तर काही ठिकाणी गायीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. वसुबारसचे महत्व अजतकने दिलेल्या माहितीनुसार, वसुबारस हा सण पुत्रप्राप्तीसाठी केला जातो.
या उत्सवात ओल्या मातीच्या गाय, वासराच्या मूर्ती पाटावर मांडून त्यांची विधिवत पूजा केली जाते. भारतीय धार्मिक पुराणांमध्ये सर्व देवता गौमातेत असल्याची मान्यता आहे.
त्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञ, दान इत्यादी करूनही प्राप्त होत नाही असे मानले जाते.
सर्व देवी-देवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे प्रसन्न करायचे असेल तर गौ भक्ती-गौसेवेपेक्षा मोठा कोणताही विधी नाही.
गाईला फक्त एक घास खाऊ घाला, तो आपोआप सर्व देवतांपर्यंत पोहोचतो, अशीदेखील मान्यता आहे. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची पूजा करतात. (स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज