टीम मंगळवेढा टाईम्स ।
बार्शी तालुक्यात ज्या गावांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध निवडून येतील, त्या गावांमधील सर्व ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय श्री भगवंत ब्लड बॅंकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी घेतला आहे.
असा निर्णय घेणारी भगवंत रक्तपेढी ही राज्यातील पहिली रक्तपेढी आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदानाच्या चळवळीला गती देणाऱ्या भगवंत ब्लड बॅंकेच्या माध्यमातून ही अभिनव संकल्पना मांडली आहे.
बार्शी तालुक्यात 94 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेले आठ महिने कोरोना महामारीने जगात थैमान घातले होते.

त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. रोजगार निर्मिती ठप्प झाली. सर्व क्षेत्रांवर आर्थिक मंदीची लाट आली.
अशा परिस्थितीमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या तर निवडणुकीमध्ये होणारा अवास्तव खर्च वाचेल. गावागावांमध्ये असलेले सूडबुद्धीच्या, ताण – तणावाच्या व आरोप – प्रत्यारोपांच्या राजकारणाला पायबंद बसेल. बिनविरोध निवडीमुळे गावा-गावांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण होईल.
गावांमध्ये निवडणुकीदरम्यान होणारे संघर्षाचे प्रसंग टळतील. गावा – गावांमध्ये शांतता राहील तसेच बिनविरोध निवडीमुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकासासाठी एकजुटीने काम करतील.
त्यामुळे उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामीण रुग्ण रक्त कल्याणकारी योजना मांडली असल्याचे शशिकांत जगदाळे यांनी या वेळी सांगितले.
मोफत रक्त देण्यामागे बिनविरोध निवडणुकीला चालना देणे, सर्व गावकऱ्यांमध्ये निरोगी व निकोप वातावरण निर्माण करणे, शस्त्रक्रिया व विविध आजारांमध्ये उपचारादरम्यान अत्यावश्यक असलेले रक्त मोफत देऊन ग्रामीण भागाविषयी असलेली सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणे हा व्यापक हेतू असल्याचेही श्री. जगदाळे यांनी या वेळी सांगितले.
भगवंत ब्लड बॅंकेच्या विधायक व कल्याणकारी योजनांमध्ये श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे व शिक्षण संस्था चालक रावसाहेब मनगिरे यांचेही भरीव मार्गदर्शन लाभत असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले.(सकाळ)



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













