मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनमधील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दोन हजार ८३५ झाला असून ७९ हजार २५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. लागण झालेल्या रुग्णांपैकी ७ हजार ६६४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आत्तापर्यंत ३९ हजार जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा प्रसार चीनबाहेरही झाला असून, या विषाणूमुळे इराणमध्ये आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधील तज्ज्ञांचा एक गट इराणमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती चीनच्या प्रशासनाने आज दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनबाहेर सर्वाधिक मृत्यू हे इराणमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इराणमध्ये होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने आपले एक तज्ज्ञ मंडळ पाठवले आहे.
कोरियात आत्तापर्यंत कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून, २७ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे. तसेच देशातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने देशात रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज