टीम मंगळवेढा टाईम्स।
उच्चभ्रू वस्तीतील बंद घराची दिवसा टेहळणी करायची, सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अवघ्या पाच ते दहा मिनिटांत चोरी करून पळायचे. उच्चभ्रू वस्तीतच चोरीच्या घटना, वेळही तीच यामुळे पोलिसांचा संशय वाढत गेला.
त्यावर पाळत ठेवली, तांत्रिक बाबींचा आधार घेतला आणि दोन जिवलग मित्रांनी मौजमजा करण्यासाठी १४ घरफोडी केल्याची घटना समोर आली. तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रदीप धनाजी हेंबाडे (वय २०, रा. ढवळस रोड, मंगळवेढा) व अजित बिरू मेटकरी (वय २९, रा.धर्मगाव रोड, मंगळवेढा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
१० एप्रिलपर्यंत दोघांना पोलिस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यात तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगीअप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव उपस्थित होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुहास जगताप, निरीक्षक रणजित माने, सहाय्यक निरीक्षक अंकुश वाघमोडे, सत्यजित आवटे यांच्यासह हवालदार हजरत पठाण, दयानंद हेंबाडे, सुनील मोरे, अजित मिसाळ, अजय शिंदे, खंडप्पा हताळे, कैलास खटकाळे, युसूफ पठाण या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांना श्री. सरदेशपांडे यांनी शाबासकी दिली.
मंगळवेढ्याच्या दोनही चोरट्यांचे राहाणीमान उंचावले
मंगळवेढा परिसरातील शिक्षक कॉलनी, मित्रनगर, वनराई कॉलनी, सप्तशृंगी नगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलनी, बनशंकरी कॉलनी तसेच मंगळवेढा परिसरातील ग्रामीण भागात चोरी सत्र सुरू होते. टप्याटप्याने १४ गुन्हे तीन महिन्यांत दाखल झाले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत होते. सीसीटीव्ही चेक करताना वरील दोघांची छबी कैद झाल्याचे समोर आले.
त्यांच्यावर पाळत ठेवली त्यांची वागणूक, राहण्याची पद्धत, दुचाकी, महागडे मोबाइल, कपडे, हॉटलिंग असा सगळाच बदल त्यांच्यात झाला होता. तांत्रिक बाबीत दोघांनी चोरी केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे मंगळवेढा पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले.
१० मिनिटात चोरीसाठी पटाईत
संशयित आरोपी प्रदीप आणि अजित दोघेजण चांगले मित्र. त्यांचे शिक्षण जेमतेम झाले. दिवसभर टेहळणी करत. एक जण घराबाहेर थांबत. दुसरा अवघ्या काही मिनिटांत दरवाजा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने, पैसे पळवत.
आलेल्या पैशातून महागडे, कपडे, मोबाइल दुचाकी, हॉटेलमध्ये जेवण करणे असा त्यांना छंद जडला होता, अशी माहिती तपासात समोर आल्याचे तपासी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज