मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
ग्रामीण भागातील गावचे पोलिस पाटील व बीट अंमलदारांच्या मदतीने आता गावागावातील अवैध हातभट्टी दारू विक्रीवर ठोस कारवाई केली जात आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार केला असून कारवाई सुरु केली आहे.
जुलैअखेर जिल्ह्याभर छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. त्यांनी शुक्रवारी सकाळ कार्यालयास भेट दिली.
जिल्ह्यातील एकूण १९ तांड्यांवर हातभट्टी दारू तयार होते. तर जवळपास २३० गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यासंदर्भातील अभ्यास तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविताना केला होता.
गावागावातील भांडण-तंटे कमी व्हावेत, तरुण व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, यादृष्टीने अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव देखील उपस्थित होते. प्रत्येक गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिस पाटलांकडून घेतली जाणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत गुरुवारी (ता. ६) जिल्ह्यातील अवैध दारू निर्मीती व विक्री करणाऱ्या ठिकाणी छापे टाकले. अवैध दारूचे २८ गुन्हे दाखल करीत पाच हजार ६०० लिटर म्हणजेच पावणेतीन लाखांचे गुळमिश्रीत रसायन जप्त करून नष्ट केले. या कारवाईत पोलिसांनी तीन लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दारूबंदी झालेल्या गावांमध्येच खुली विक्री
जिल्ह्यातील जवळपास १५० पेक्षा अधिक गावांमध्ये मागील काही वर्षांत दारूबंदीचे ठराव झाले आहेत. पण, चिंतेची बाब म्हणजे त्यातील बहुतेक गावांमध्ये खुलेआम हातभट्टी दारू विकली जात आहे. अनेकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात त्यासंबंधीचे अर्ज देखील दिले. पण, ठोस कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे एका पाठोपाठ अनेक अवैध धंदे त्याठिकाणी सुरु झाल्याची वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रीवर आता ठोस कारवाई सुरु केली आहे. हातभट्टी निर्मिती थांबविण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन पुन्हा अधिक जोमाने राबविले जाईल. पोलिस पाटील व बीट अंमलदारांनी त्यांच्या त्यांच्या गावातील अवैध धंद्यांची माहिती तत्काळ कळवावी.- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर.
लोकांची सेवा करणाऱ्या प्रत्येक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून पारदर्शक कामाची अपेक्षा आहे. कोणी पैसे मागत असल्यास त्यांच्याबद्दल थेट तक्रार वरिष्ठांकडे करावी. कोणी पैसे घेतल्यास त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याला सेवेतून थेट निलंबित केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, आता ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत आता नवीन दत्तक अधिकारी नेमले जाणार आहेत.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज