टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर-गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली साखर विकून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश सहकार विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत.
या आदेशाने संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक अडचणींमुळे यंदा श्री.विठ्ठल साखर कारखाना बंद राहिला. त्यातच सन २०२०-२१ या हंगामातील गळीत उसापोटी ३९ कोटी ७६ लाख ३३ हजार रुपये एफआरपी रक्कम थकीत राहिली.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा, आंदोलने करीत होते.
दरम्यान, कारखान्याच्या गोदामात १ लाख ९ हजार ९७३ क्विंटल साखर विक्री अभावी पडून आहे. ही साखर विकून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, यासाठी आरआरसी कारवाई करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना आदेश देऊन सुरू केली होती.
मात्र, राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर असलेल्या थकीत कर्जपोटी ही साखर जप्त केली होती. परिणामी साखर विक्रीची कार्यवाही ठप्प राहिली.
शेतकऱ्यांच्याही अडचणींमध्ये भर पडली. साखर विकून प्राधान्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे द्यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
यासाठी कांही सभासदांनी उच्च न्यायालयातही दाद मागितली. कारखान्याचे संचालक मंडळही सातत्याने हा विषय मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत होते.
अखेर सहकार विभागाचे उपसचिव अं.पा. शिंगाडे यांनी राज्य सहकारी बँक आणि कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आदेश दिले.
राज्य सहकारी बँकेला ११.३६ कोटी रुपये, शेतकऱ्यांना समान बिल द्या
राज्य सहकारी बँकेने विहीत पद्धतीने कारखान्याच्या गोदामात असलेली १ लाख ९ हजार क्विंटल साखर विकून ३१ रुपये किमान हमीभावा नुसार येणाऱ्या रकमेतील २२ कोटी ७३ लाख रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर देण्यात यावेत.
तसेच ११ कोटी ३६ लाख रुपये राज्य सहकारी बँकेला द्यावेत. उपलब्ध पैशातून संपूर्ण एफआरपी रक्कम अदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध रक्कमेतून समान पद्धतीने वाटप करण्यात यावे,
साखर विक्रीतून कारखान्याचे कोणतेही व्यापारी देणे अदा करून नये, असेही या आदेशात नमूद केले आहे. सहकार विभागाच्या या आदेशाने गेल्या दीड वर्षांपासून लाखो रुपये अडकून पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अडचणी आणणाऱ्यांनी साखर वाटणे हास्यास्पद.
“राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील होते.
मात्र, काही लोकांनी राज्य सहकारी बँकेकडे तक्रारी करून साखर विक्रीत अडचणी आणल्या. आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसबिलाचे पैसे मिळावेत म्हणून राज्य सहकारी बँकेला साखर विक्रीसाठी आदेश दिले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील. मात्र ज्यांनी अडचणी आणल्या त्यांनीच साखर वाटणे हास्यास्पद आहे. – भगीरथ भालके, अध्यक्ष श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज