टीम मंगळवेढा टाईम्स।
हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसाचा शेती पिकांना मात्र फटका बसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अवकाळी वादळी पावसानं चांगलेच झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसामुळं यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल भिजला आहे.
बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. आधीच शेतकऱ्यांचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं आणि आता अवकाळी वादळी पावसमुळं मोठं नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातील उमरखेड, महागाव,, यवतमाळ, राळेगाव, नेर, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस या तालुक्यात मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसामुळे 400 हेक्टर वर फळबाग, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोगबिन, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात एका आठवड्यात तब्बल 11 अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 18 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात 43.6 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्या दिवशी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र, काल चंद्रपूर जिल्ह्यात झाली अवघी 32.8 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.
अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात गारपिटसह अवकाळी पाऊस झाला. निंबोरा बोडखा, चिंचोली, सोनेगांव, हिरपुर, आजनगाव, कळासी भागात गारपीट झाली. रस्त्यावर झाडे पडल्यानं नागपूर-औरंगाबाद महामार्ग काही वेळासाठी बंद झाला होता. आता वाहतूक सुरळीत झाली आहे. तर भातकुलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले आहे.
जालना जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. अंबड घनसावंगी तालुक्यात अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसला. यामुळं रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी आंबा आदी फळबागांच देखील मोठ नुकसान झालं आहे.
उन्हाळी हंगामातील टरबूज खरबूज ही फळ पिके या तडाख्यात नष्ट झाली आहेत. दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळं शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाची अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यात आता नवीन नुकसान झालं आहे.
वर्धा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वर्ध्यात पावसासह गारा पडल्या. पावसामुळं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वर्ध्याच्या ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहेय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज