टीम मंगळवेढा टाईम्स ।
जानेवारीच्या सुरवातीला १०५ टक्क्यांवर असलेले उजनी धरण आता ४९ टक्क्यांवर आले आहे. अडीच महिन्यांत धरणातील तब्बल २६ टीएमसी म्हणजेच ४९ टक्के पाणी संपले आहे.
आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले असून, शेतीसाठी सोडलेले पाणी १० मेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे मेअखेरीस धरण तळ गाठण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात मार्च ते १० जूनपर्यंत कडक उन्हाळा जाणवतो. आता तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाष्पीभवनामुळे देखील धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे.
भीमा नदी व कॅनॉल, बोगदा आणि उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडल्याने १२ तासांत एक टक्का पाणी पातळी घटत आहे. सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडलेले पाणी ३१ मार्चपर्यंत सुरूच राहणार असल्याने मार्चअखेर धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर येईल.
तेथून शेतीसाठी सोडलेले पाणी १० मेपर्यंत सुरूच राहणार असल्याने पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षाही कमी होऊ शकतो.. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरण मायनसमध्ये जाईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
कारण, मे महिन्यात सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे.
शेतीसाठी १० मेपर्यंत सुरुच राहणार पाणी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून पहिल्यांदाच कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतीसाठी १० मेपर्यंत सलग पाणी सोडले जाणार आहे. सध्या उजवा व डावा कालवा, कॅनॉल (३००० क्युसेक), बोगदा (१००० क्युसेक), दहिगाव (१२० क्युसेक) आणि सीना-माढा उपसा सिंचन (३३३ क्युसेक) योजनेतून सध्या शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.
वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्याने ते पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सहा हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. ३१ मार्च रोजी ते पाणी बंद केले जाणार आहे.
गाळ पाहणीसाठी केंद्रीय पथक धरणावर
उजनी धरणात सद्य:स्थितीत १४ टीएमसी गाळ आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सेंट्रल वॉटर कमिशनच्या माध्यमातून गाळाचा सर्व्हे केला जात आहे.
१८ मार्च रोजी कमिशनचे अधिकारी उजनी धरणावर दाखल झाले असून मागील पाच दिवसांपासून गाळाचा अंदाज घेतला जात आहे. त्यांचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.(स्रोत:सकाळ)
धरणाची सद्यस्थिती
■ एकूण पाणीसाठा ९०. ८७ टीएमसी
■ जिवंत पाणीसाठा २७.२१ टीएमसी
■ पाण्याची टक्केवारी ४९.१० टक्के
■ धरणातून सोडलेला विसर्ग १०,४५३ क्युसेक
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज