टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य उत्पादन शुल्कच्या माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढ्यातील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यातील दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपी ग्राहकांना न्यायालयाने ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला.
तसेच मंगळवेढा-मरवडे रस्त्यावर एका चारचाकी वाहनातून विदेशी दारुच्या वाहतुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक संदिप कदम यांनी मंगळवेढ्याच्या हद्दीतील होटेल जयभवानीवर छापा टाकला असता ढाबा मालक कुमार सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह पाच मद्यपी ग्राहक समाधान खवणकर, आप्पा जाधव, सोमनाथ जाधव, आप्पा मोरे व सुनिल वर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली.
एका अन्य कारवाईत सांगोल्याचे दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे यांच्या पथकाने मंगळवेढा हद्दीतील होटेल भैरवनाथ येथे छापा टाकून होटेल मालक शुभम जोध व मद्यपी ग्राहक अनिल जाधव, दीपक जाधव, दीपक लोंढे व महेश बोरकडे यांच्यावर कारवाई केली.
दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता मंगळवेढ्याच्या न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. गंगवाल शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक संदिप कदम, कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
विदेशी मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंगळावेढा-मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे (वय २६, रा. भोसे, ता. मंगळवेढा) हा त्याच्या व्हॅनमधून (क्र. एमएच १३ डी इ ३४३८) विदेशी दारुची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या ४८ बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २२ बाटल्या व वाहन असा एकूण एक लाख ४३ हजार ८८४ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज