टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा लोकसभेची निवडणूक ही वैचारिक लढाई किंवा मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नाही, तर ही लढाई फलटणमध्ये मर्यादित आहे. येथे धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार असले तरी दोन निंबाळकरच आमने-सामने आहेत.
माझ्या वडिलांनी जी कामे 20 ते 25 वर्षांत केली. तीच कामे या गृहस्थाने सहा महिन्यांत करून दाखवली आहेत. इतकी त्यांची क्षमता असेल तर त्याला पंतप्रधान करूया, असा टोला रामराजेंचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लगावला.
फलटण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार शरद पवारांपुढे अनिकेतराजे निंबाळकर यांनी तुफान टोलेबाजी केली.
या वेळी त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. या वेळी विजयसिंह मोहिते पाटील, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
अनिकेतराजे निंबाळकर म्हणाले, ‘खासदार शरद पवा साहेब, विजयदादा व माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर माझे हे पहिलेच भाषण आहे.
या मतदारसंघातून धैर्यशील पाटील जिंकणार याबाबत कोणालाही शंका नाही. आम्ही फलटणमधून जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत. यावेळची ही निवडणूक खूपच विचित्र आहे. पहिल्यांदा आपण घड्याळाचा प्रचार करत नाही. मला ते फार विचित्र वाटत आहे.’
पवारांशी जुने संबंध…-
‘काही झाले तरी शरद पवारांच्या घराशी आमच्या घराचे जुने संबंध आहेत. प्रसंगांनी काही बदल घडविले पण, आमचे संबंध कायम आहेत. मला ही वैचारिक लढाई किंवा मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई नाही. तर ही लढाई फलटणमधील मर्यादित असून, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबतच दोन निंबाळकरच रिंगणात उभे आहेत,’ असं अनिकेतराजे निंबाळकर म्हणाले.
आमच्या घराण्याशी त्यांचा संबंध नाही…-
याशिवाय ‘आमच्या घराण्याने आजपर्यंत असंख्य कामे केली आहेत. त्याला न्याय द्यावा. एक तर आमचं नेतृत्व तरी घ्या, नाहीतर त्यांचे नेतृत्व घ्या. पाच वर्षे किती कामे झालीत हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आमच्या कार्यकर्त्यांवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पातळी सोडून टीका केली आहे.
आमच्या आजी, आजोबांवरही पातळी सोडून बोलला आहेत. त्याचा आमच्या राजघराण्याशी व आमच्याशी काडीचाही संबंध नाही. माझ्या वडिलांनी फलटण तालुक्यात गेल्या 20 ते 25 वर्षे काम केलं आहे.
पण, तेच काम त्या गृहस्थाने सहा महिन्यांत करून दाखवले आहे. इतकी त्याच्यात क्षमता असेल, तर त्यालाच पंतप्रधान करून टाकूया,’ असा टोला त्यांनी खासदार निंबाळकर यांना लगावला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज