टीम मंगळवेढा टाईम्स।
मुद्दल व व्याज देऊनही आणखी जादा पैशांसाठी खासगी सावकारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून फळ विक्रेत्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात येथील डॉक्टरसह तिघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच सावकारकी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.साळुंखे यांनी दिले.
डॉ. आनंद माणिकराव गायकवाड (रा. संतपेठ), सतीश मारूती रोकडे (रा. अनिलनगर ) व विजय शहाणे (रा. सह्याद्रीनगर, इसबावी) अशी खासगी सावकारकी करणाऱ्या त्या तिघांची नावे आहेत.
यातील यल्लाप्पा पांडुरंग घुले (रा. संतपेठ) यांनी आपल्या व्यवसायासाठी साडेपाच तोळे सोन्याचे दागिने बेकायदेशीररित्या सावकारकी करणाऱ्या डॉ.गायकवाड याच्याकडे गहाण ठेऊन दरमहा ६ टक्के व्याजाने ७० हजार रूपये घेतले होते.
तसेच सतीश रोकडे याच्याकडून २० हजार, तर विजय शहाणे याच्याकडून १० हजार रूपये दरमहा १० टक्के व्याजाने घेतले होते. त्यानंतर घुले यांनी वेळोवेळी व्याजासह या रक्कमांची परतफेड केली.
त्यामुळे मार्च २०२२ मध्ये ते गहाण ठेवलेले सोने परत आणण्यासाठी गेले असता डॉ.गायकवाड याने आणखी ४ लाख ७० हजार रूपये येणे असल्याचे सांगून सोने देण्यास नकार दिला.
तसेच रोकडे याने आणखी २ लाख, तर शहाणे यानेही जादा १ लाखाची मागणी सुरू केली. या पैशांसाठी घुले यांना ते सतत धमक्या व शारीरिक, मानसीक त्रास देऊ लागले.
यातूनच घुले यांनी दि. २४ एप्रिल रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी कै.घुले यांची डायरी व एक चिठ्ठी कुटूबियांना सापडली. त्यात या खासगी सावकारांची नावे नमूद असल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती पत्नी अंजना यल्लाप्पा घुले यांनी शहर पोलिसांना केली.
मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने अंजना यांनी अॅड. अमोल देसाई यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली. यामध्ये न्यायालयाने सदर सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
याकामी फिर्यादी तर्फे अॅड. अमोल देसाई, अॅड. विशाल वाघेला, अॅड. राजेंद्रप्रसाद पुरी, अॅड. सत्यम धुमाळ यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज