टीम मंगळवेढा टाईम्स ।
सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सध्या महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठांशी चर्चा करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तुर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्यात
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या.
दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत पार पडेल. कोरोनाच्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी बाळगून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले उदय सामंत?
एखाद्या घटकाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही, हीच महाविकासआघाडीची भूमिका आहे. विजय वडेट्टीवार हे सातत्याने ओबीसी समाजाची भूमिका मांडत आहेत.
मात्र, त्यावरुन मंत्रिमंडळात कोणताही वाद नाही, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज