टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुंबई-बंगळुरू महामार्गावर नन्हे येथील नवले पूल परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
अंजुम वजिर मुजावर (वय १९,रा.मंगळवेढा, जि.सोलापूर) व फातिमा इरफान पटेल (वय ३५ , रा . विद्यानगर, काळेवाडी, पुणे) अशी त्या दोन महिलांची नावे आहेत. ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने समोर असणाऱ्या पिकअप वाहनाला पाठीमागून धडक दिली.
त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या तीन दुचाकींना पिकअपची जोरदार धडक बसली. यामध्ये पिकअप वाहन पलटी झाले.
यामध्ये दुचाकीवर बसलेल्या दोन महिलांना जोराचा मार लागल्याने त्यांचे जागीच निधन झाले. तर इतर चार व पिकअप चालक गंभीर जखमी झाले.
घटनेचे वृत्त समजताच नन्हे गावाचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ.बी.एन. आहेर व गावातील कार्यकर्त्यांनी जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी#Pune #Accidents #punenews pic.twitter.com/HVI36AtdLf
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2021
अपघातानंतर कंटेनर चालक न थांबता पुढे निघून गेला होता. मात्र पुढे ४०० मीटर अंतरावर पुन्हा त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या कठड्यावर वाहन गेले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्या तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग विभागाच्या ने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज