टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा 15 जून 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ.शिवकुमार गणपूर यांनी दिली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली
या परीक्षा 15 जून 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी करण्यात आली आहे.
बीए, बीकॉम, बीएस्सी, एम ए, एमकॉम, एम एससी, एमबीए, एमसीए आदी पारंपारिक व व्यवसायिक विद्याशाखांच्या सर्व विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन व तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे.
त्यानुसार शहरात 24 तर ग्रामीण भागात 47 असे एकूण 71 केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. यामध्ये पदवी व पदव्युत्तर मिळून एकूण 70 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत.
सुरुवातीला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. 15 जून ते 20 जुलै 2022 पर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन तासाच्या पेपरला 45 मिनिटे वाढीव वेळ मिळणार
एका तासाला 15 मिनिटे अधिकचा वेळ
कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली.
त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे.
तीन तासाचा पेपर असल्यास 45 मिनिटे अधिक मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची तयारी पूर्ण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची तयारीही पूर्ण झाली आहे.
चोख नियोजन करण्यात आले आहे. कॉपी सारख्या गैर प्रकारास आळा घालण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शांततेत व निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.शिवकुमार गणपूर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज