टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबाहेर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला असून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सोलापूर ग्रामीण घटकातील अक्कलकोट, मोहोळ, बार्शी,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोना संसर्गाची वाढत असलेली साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने मोहोळ, बार्शी, वैराग, अक्कलकोट या शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील 26 गावांमध्ये कडक लॉकडाउन करणे आवश्यक आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
शहरातील रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून तीनशेहून अधिक रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले आहेत.शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना पोहचला नव्हता. मात्र, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रुग्णांची वाढ झाली.
आता सोलापूर ग्रामीणमधील रुग्णसंख्या नऊशे पर्यंत पोहचली आहे. तर दुसरीकडे सोमवार पर्यंत मृतांची संख्या 38 झाली होती. तसेच जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक 279 रुग्ण आढळले असून बार्शीत 178, अक्कलकोटमध्ये 156, उत्तर सोलापूर तालुक्यात 91 तर मोहोळ तालुक्यात 45 रुग्ण आढळले आहेत. रुग्ण वाढत असलेल्या गावांमधील तथा शहरांमधील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने पोलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पाठविला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रस्ताव
मोहोळ, वैराग,अक्कलकोट, बार्शी या शहरांबरोबरच जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्यातील (26 गावे) ज्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, अशा ठिकाणी कडक लॉकडाउन करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिला आहे.
–अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक
कडक लॉकडाउन ‘या’ गावांमध्ये करण्यासाठी प्रस्ताव
अक्कलकोट शहर, बार्शी व वैराग शहराबरोबर ,दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा, कासेगाव, उळेगाव, विडी घरकूल, कुंभारी, वळसंग, होटगी, लिंबिचिंचोळी, तांदूळवाडी या गावांमध्ये कडक लॉकडाउन केला जाणार आहे. तसेच मोहोळ शहराबरोबरच तालुक्यातील कुरुल, कामती खु., कामती बु. आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, मार्डी, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा व भोगाव या गावांचाही प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज