टीम मंगळवेढा टाईम्स । पत्नीला ताप आल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पत्नीला कोरोना झाल्याच्या संशयातून पतीने राहत्या घरी नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिमन्यू भगवान कसबे (वय 70) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. (Husband commits suicide for fear of his wife becoming Corona)
न्यू बुधवार पेठ येथील राहुल चौकात राहणारे अभिमन्यू कसबे यांची पत्नी शारदाबाई कसबे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. ताप वाढल्याने त्यांना नातू शुभम कसबे यांनी मंगळवारी सकाळी 6.30 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे पती अभिमन्यू कसबे सकाळपासूनच टेन्शनमध्ये होते. ते सतत नातवाला फोन करून पत्नीची चौकशी करीत होते.
तो आजी बरी आहे, असे सांगत होता. परंतु, अभिमन्यू यांचा नातवाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ते शासकीय रुग्णालयात नेण्याचा आग्रह करीत होते. मात्र, शासकीय रुग्णालयात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले. तेव्हा आपल्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे, असा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी जेवणाकडेही दुर्लक्ष केले. मंगळवारी रात्री नातू घरी आला. त्याने आजोबांना आजी बरी असल्याचे सांगितले; पण अभिमन्यू यांचे समाधान झाले नाही. तेव्हा अभिमन्यू यांनी पुन्हा एकदा नातवाकडे शासकीय रुग्णालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली; पण तसे जाता येणार नाही, असे सांगितल्यावर ते झोपण्यासाठी गेले.
त्यानंतर अभिमन्यू कसबे हे बुधवारी पहाटे 5.30 वाजता उठले. घरातील काही कामे केली. त्यावेळी घरात सून व नातू झोपल्याचे पाहून ते दुसर्या खोलीत गेले व नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यांना रुग्णालयात नेले पण…
शारदाबाई कसबे यांना आपण ज्या दवाखान्यात आहोत त्याच दवाखान्यात आपल्या पतीचा मृतदेह आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. शासकीय रुग्णालयात येतो म्हणणारे अभिमन्यू कसबे हे शेवटी शासकीय रुग्णालयात गेले, पण ते आपली पत्नी शारदाबाई यांना पाहू शकले नाहीत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज