टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये काल शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला व्यापारी, दुकानदारांसह सर्व सामान्य नागरिकांचा विरोध कायम आहे.
दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी येथील संचारबंदीबाबत मौन बाळगल्याने त्यांच्याविषयी पंढरपूरसह पाचही तालुक्यातील व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आषाढी यात्रेच्या संचारबंदीनंतर पुन्हा पंढरपूरकरांवर संचारबंदी लादली आहे. या विरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला होता. गेली तीन दिवस आंदोलनही केले. त्यानंतरही प्रशासनाने संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी पालकमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकूण घेण्यासाठी पंढरपुरात येणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी येथील व्यापाऱ्यांच्या या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याची भावना व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
संचारबंदीविषयी त्यांनी चार ते पाच दिवसांत साधा ‘ब्र’ शब्ददेखील काढला नाही. त्यांच्या या मौनाविषयी पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा येथील व्यापारी व नागरिकांमधून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
सततच्या कडक निर्बंधांमुळे पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. आषाढी यात्रेत पंढरपुरात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे ऐन यात्राकाळात व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता.
त्यानंतर पुन्हा अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. परिणामी, येथील व्यापारी व छोटे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संचारबंदीच्या विरोधात येथील व्यापारी संघाने आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनात भाजप, मनसे, शिवसेनेसह इतर सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.
पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनाही अजित पवार यांची भेट घेवून संचारबंदी मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु कोणताच दिलासा मिळालेला नाही.
मागील चार ते पाच दिवसांच्या आंदोलनादरम्यान पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी पंढरपुरात येणे अपेक्षित होते.
परंतु त्यांनी तसे न करता पंढरपूरकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यांच्या या नरो वा कुंजरोवा भूमिकेविषयी पंढरपूरसह इतर तालुक्यांतील व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सततच्या लाॅकडाऊनमुळे येथील व्यापारी त्रस्त आहेत. अशातच पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध करत तीन दिवस आंदोलनदेखील केले. दरम्यान येथील व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे पालकमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी लक्ष देणे आवश्यक होते.
परंतु त्यांनी या विषयी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यांनी पंढरपुरात येणे अपेक्षित होते. पालकमंत्री म्हणून भरणे यांनी तोडगा काढवा, अशी मागणी पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविय मोहोळकर यांनी केली.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज